कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. येडीयुरप्पा यांचे स्वीय सहाय्यक एम. आर. उमेश यांच्या घरी आणि कार्यालवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यावेळी आयकर विभागाने कर्नाटकसह तीन राज्यांत घातलेल्या छाप्यामध्ये सुमारे 750 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे आता कर्नाटकच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीवनुसार, माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे निकटवर्तीय एम.आर. रमेश यांच्यासह 47 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, महामार्ग आणि सिंचन प्रकल्पांची कंत्राटे घेणाऱ्या बंगळूरुस्थित तीन मोठ्या कंपन्यांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. 300 कर्मचाऱ्यांसह 7 ऑक्टोबरला आयकर विभागाने ही मोठी कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळूरुस्थित असलेल्या तीन बड्या कंपन्यांनी बोगस खरेदी, कामगार खर्च आणि बनावट उपकंत्राटे यांचा खर्च दाखवून उत्पन्न कमी दाखवले होते असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 750 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता उघड झाली आहे. दरम्यान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे साहाय्यक उमेश हे शिमोगा जिल्ह्यातील आयनूरचे रहिवासी आहेत. तसेच सुरुवातीला उमेश बीएमटीसीमध्ये चालक म्हणून काम करत होते. यलहंका येथील पुट्टेनहळ्ळीच्या बीएमटीसी डेपोमध्ये उमेश नोकरी करत होते.