मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. जळगावमधील जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या अटकेनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, संजय राऊत यांच्यावर तत्काळ कारवाई झालेली नाहीये. तक्रार आली आणि कारवाई झाली, असे झालेले नाही.
बहुचर्चित पत्राचाळ प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू होती. त्यांना अनेकदा समन्स आले, चौकशीला बोलावले. पण, त्यांनी सहकार्य केले नाही. म्हणून ईडी त्यांच्या घरी गेली. ईडी सहजासहजी, अशी कारवाई करीत नाही किंवा अटक करीत नाही. संजय राऊत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही आहात. स्वतःला तुम्ही काय समजता, जरा अंतर्मुख होऊन विचार करा.
आता लोकांना भावनिक आवाहन करून काहीही उपयोग नाही. काहीही आरोप करण्यात अर्थ नाही. नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनाही संधी देण्यात आली होती. तशीच संधी संजय राऊतांनाही दिली गेली. पण, त्यांनी टाळाटाळ केली. ईडीने सखोल चौकशी करूनच त्यांना अटक केली आहे. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय. हा विरोधकांचा आरोप चुकीचा, विरोधकांना असे बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असेही महाजन म्हणाले.