काँग्रेस पक्षात आताच्या घडीला मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यपदी नियुक्ती केलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. एकीकडे निवडणुका उंबरठ्यावर असताना दुसरीकडे काँग्रेसमधील कलह पक्षासाठी चिंता वाढवणार ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे हे असे निर्णय कोण घेतंय याची आपल्याला कल्पना नसल्याचं सांगत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. कॉँग्रेसने लवकरात लवकर वर्किंग कमिटीची बैठक बोलवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांनीही तशी मागणी केली आहे.
कपिल सिब्बल म्हणाले की, मी त्या काँग्रेस नेत्यांच्या वतीनं बोलत आहे ज्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वर्किंग कमिटी आणि सेंट्रल इलेक्शन कमिटीला पक्षाच्या अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीसाठी पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या उत्तराची आम्ही अजूनही वाट पाहतोय असं ते म्हणाले. सरकारविरोधात लढा देण्यासाठी एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला बळकट करण्याची गरज असल्याचे सांगून; पक्षाध्यक्ष, सीडब्ल्यूसी आणि केंद्रीय निवडणूक समिती यांच्या निवडणुका घेण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार देखील त्यांनी केला.